माणुसकीचा धडा:
शिक्षक आणि एका चिमुकल्याची हृदयस्पर्शी कहाणी
सुदाम साळुंके सर, उपाध्यापक
जि. प. प्राथमिक शाळा पळशी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर
दिनांक ९ सप्टेंबर २०२५. माझ्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची ही सुरुवात होती. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पळशी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर येथे माझी बदली झाली आणि याच दिवशी मी मोठ्या उत्साहात नव्या शाळेत रुजू झालो.
दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेच्या परिपाठामध्ये स्वतःची ओळख करून देताना माझा घसा पूर्णपणे बसला होता. शब्द बाहेर पडत नव्हते. कसेबसे मी माझे नाव सांगितले आणि काही महत्त्वाच्या सूचना मुलांना दिल्या. पण, घसा दुखत असल्याने आवाज खूपच वेगळा आणि अस्पष्ट येत होता.
परिपाठानंतर आम्ही शिक्षकांनी कामाची वाटणी केली आणि माझ्या वाट्याला इयत्ता चौथीचा वर्ग आला. माझ्या ३५ वर्षांच्या नोकरीतील प्रत्येक नवी शाळा आणि नवी सुरुवात माझ्यासाठी एक नवा अनुभव घेऊन येत होती. वर्गात प्रवेश करताच मुलांनी फुले देऊन माझे स्वागत केले. मी प्रथम वर्गात अगरबत्ती लावली आणि पहिल्या दिवसाची सुरुवात "सुबह सबेरे लेकर तेरा नाम प्रभू" या प्रार्थनेने केली. पहिला दिवस असल्याने मुलांना पुस्तकी ज्ञान देण्याऐवजी मी शिस्त आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. मुलांच्या मनात नवीन शिक्षकांबद्दल असलेली भीती घालवण्यासाठी मी शिकवण्याऐवजी त्यांच्याशी गप्पा मारून आणि मैत्री करून हा दिवस घालवला. पण, माझा घसा अजूनही साथ देत नव्हता हे जाणवत होते.
दुपारनंतर, चार वाजण्याच्या सुमारास मी मुलांना पुढे बोलावले आणि त्यांना पहिल्या दिवसाचा अनुभव कसा वाटला, त्यांच्या मनात आधी कोणते विचार होते, हे सांगायला सांगितले. सुरुवातीला मुलांना थोडे अवघडल्यासारखे वाटले, पण मी त्यांना धीर दिला. "तुम्हाला जसं बोलता येईल तसं सांगा," असे सांगितल्यावर काही मुले स्वतःहून पुढे आली. त्यांच्या मनोगतात त्यांनी सांगितले की, "आम्हाला वाटले की नवीन सर रागीट स्वभावाचे तर नसतील ना? आमच्या मनात खूप भीती होती, पण तुम्ही पहिल्याच दिवशी खाऊ देऊन आमचे तोंड गोड केले आणि आम्हाला शिस्तीचे महत्त्वही पटवून दिले." नंतर लाजरी आणि कमी बोलणारी मुलेही धीटपणे पुढे येऊन आपले मनोगत व्यक्त करू लागली. त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव पाहून मला पहिल्याच दिवशी या मुलांनी आपलेसे केले, असे वाटले. माझ्या मनात त्यांच्याविषयीची आत्मीयता वाढली.
संध्याकाळी घरी गेल्यावर कामाच्या धावपळीत मला माझ्या घशासाठी औषध घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही माझ्या घशाची परिस्थिती तशीच होती. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो, परिपाठ झाला आणि मुलांना आवश्यक माहिती देऊन मी वर्गात गेलो. मुले शांतपणे आपापल्या जागी बसली होती. मी मुलांची हजेरी घेतली आणि तेवढ्यात एक चिमुकला विद्यार्थी माझ्या जवळ आला. त्याने माझ्या हातात नारंगी रंगाच्या गोळ्यांचे पाकीट ठेवले.
मला वाटले की हे चॉकलेट आहे. "हे काय आहे बाळा?" असे विचारताच, तो म्हणाला, "या स्ट्रेप्सिल्सच्या गोळ्या आहेत सर, तुमचा घसा दुखतोय ना, म्हणून तुमच्या घशासाठी!" त्याचे ते निरागस शब्द ऐकून माझ्या डोळ्यांत पाणी तरळले. एका नवीन शिक्षकासाठी त्याच्या मनात असलेली ही आपुलकी पाहून मी निःशब्द झालो. माझ्यासाठी हा क्षण खूपच भावनिक होता.
मी त्याला जवळ घेतले आणि विचारले, "या गोळ्या तुला कोणी दिल्या?" त्याने जो अनुभव सांगितला, तो माझ्या मनाला खोलवर भिडला. तो म्हणाला, "मी माझ्या पप्पांना सांगितले, 'आमच्या नव्या सरांचा घसा दुखतोय. मला त्यांच्यासाठी घशावरच्या गोळ्या घ्यायच्या आहेत, मला पैसे द्या.' पप्पांनी पैसे दिल्यावर मी मेडिकलमधून तुमच्यासाठी गोळ्या घेतल्या."
त्याच्या या बोलण्याने माझे मन भरून आले. एका लहानग्याने माझ्यासाठी केलेली धडपड, त्याचे निस्वार्थ प्रेम माझ्यासाठी अनमोल होते. पळशीसारख्या एका लहानशा खेड्यातील, जिथे मुले वाडी-वस्तीवरून तीन-चार किलोमीटर पायपीट करून येतात, अशा परिस्थितीत हर्ष झावरेसारख्या मुलाने दाखवलेली ही माणुसकी खरोखरच मन हेलावून टाकणारी होती.
हर्ष झावरे हा स्वभावाने शांत आणि अबोल होता, पण अतिशय समजूतदार. घरची परिस्थिती बेताची. त्याचे आई-वडील शेती व मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवतात. अशा परिस्थितीतही त्याने माझ्यासाठी केलेली ही कृती खूप मोठी होती. माझ्या ३५ वर्षांच्या नोकरीत मला अनेक अनुभव आले, पण हर्षने दिलेल्या या अनमोल भेटीची सर कशालाच येणार नाही. एका चिमुकल्याच्या निरागस चेहऱ्यावर दिसणारे प्रेम आणि शिक्षकांबद्दलची आत्मीयता पाहून मला माझ्या व्यवसायाचा सार्थ अभिमान वाटला.
या घटनेने मला हेच शिकवले की ज्ञान देणे-घेणे हे फक्त पुस्तकांपुरते मर्यादित नसते, तर त्यात मानवी भावना आणि प्रेम यांचाही समावेश असतो. हर्षने दिलेल्या या गोळ्या फक्त औषध नव्हते, तर ते त्याच्या निर्मळ मनाचे प्रतीक होते. तो प्रसंग आठवला की आजही माझ्या डोळ्यांत पाणी येते. एका लहानग्याने मला निःशब्द केले आणि जीवनातील सर्वात मोठा माणुसकीचा धडा शिकवला.

